"मन चिंब पावसाळी"... दीर्घकाळ प्रतीक्षा केलेला पाऊस सारे अडथळे पार करून अखेर एकदाचा येतो आणि कमालीच्या उन्हानं करपत चाललेलं आपलं काळीज ओलं-ओलं करून टाकतो . मग आत आत कुठंतरी जपून ठेवलेल्या कित्येक आठवणी ताज्या करीत आपल्या मनाची तिजोरी आनंदाने भरून टाकतो . आठवणींचे सारे कप्पे कधी तरी सवडीनं मी अलगद उघडून बघतो, तेव्हा ते समस्त निम्मे -अधिक पावसाच्या पाण्यानंच भरलेले असतात. . करकरीत, निळा रेनकोट घातलेला तो शाळेचा पहिला दिवस , ओलेकच्च भिजलेले माझे केस आणि हात-पाय टॉवेलनं खसाखसा पुसणारी आई, आजीबरोबर फुलपात्रात वेचलेल्या गारा , ओल्या मातीचा खमंग वास, अळवाच्या पानांवर डुचमळणारा तो दंवबिंदू , काही क्षणच दिसून अकस्मात अदृश्य झालेलं इंद्रधनुष्य , शाळेभोवती साचलेलं डबकं, त्यात सोडलेल्या होड्या, एकमेकांच्या अंगावर उडवलेलं पाणी. . हे सर्व आठवून मन गाऊ लागतं - " ए आई, मला पावसात जाऊदे ; एकदाच गं , भिजुनी मला; चिंब चिंब होऊदे !' पण तो निरागसपणा आता शक्य नाही. तारुण्यानं माझ्यातलं बाल्य कधीचंच हिरावून नेलंय. . पावसाचा आनंद घेण्याची प्रत्येकाची पद्धत निराळी असते. काही जण...