विद्ध्येचे अधिपती , देवांचे सेनापती , शस्त्र आणि शास्त्र पारंगत , कवींचे कवी , विघ्नविनाशक , मंगलदायक , बुद्धिदाता , सिद्धिदाता आणि तुम्हा आम्हा सगळ्यांचा लाडका गणपतीबाप्पा ... कागदावर रेखाटायचा असेल तर अक्षरशः काही सेकंदात रेखाटता येतो . एक साधे प्रश्नार्थक चिन्ह काढले तरी त्याला गणेशाचा आकार देता येतो . काही वेळा काही मिनिटांत मातीच्या गोळ्याला गणेश रूपात परिवर्तित करता येते ; तर काही वेळा उत्तम , रेखीव , कोरीव , भव्य दिव्या अश्या मूर्ती करायला काही महिने पण लागू शकतात . इतका सहजसुंदर आणि तितकाच खडतर अश्या ह्या विघ्नविनाशक , मंगलदायक , बुद्धिदाता असलेल्या गणेशाची गुणसंपन्न प्रतिमा आपल्या मनात भक्तिसागर निर्माण करते . श्रावण - भाद्रपदातला पाऊस पिऊन तृप्त होऊन तारुण्य परिधान केलेलं कोकण आणि गणपती बाप्पाचं दर्शन हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. बरसणाऱ्या सरी आणि मागून येणार लक्ख ऊन , दुतर्फा हिरव्यागार भातशेतीची सोबत , वळणावळणाचे रस्ते आणि अचानक बाजूला...