विद्ध्येचे
अधिपती, देवांचे सेनापती, शस्त्र आणि शास्त्र पारंगत, कवींचे कवी, विघ्नविनाशक, मंगलदायक , बुद्धिदाता, सिद्धिदाता आणि तुम्हा आम्हा सगळ्यांचा लाडका गणपतीबाप्पा... कागदावर रेखाटायचा असेल तर अक्षरशः काही सेकंदात रेखाटता येतो. एक साधे प्रश्नार्थक चिन्ह काढले तरी त्याला गणेशाचा आकार देता येतो. काही वेळा काही मिनिटांत मातीच्या गोळ्याला गणेश रूपात परिवर्तित करता येते ; तर काही वेळा उत्तम, रेखीव, कोरीव, भव्य दिव्या अश्या मूर्ती करायला काही महिने पण लागू शकतात. इतका सहजसुंदर आणि तितकाच खडतर अश्या ह्या विघ्नविनाशक, मंगलदायक, बुद्धिदाता असलेल्या गणेशाची गुणसंपन्न प्रतिमा आपल्या मनात भक्तिसागर निर्माण करते.
श्रावण -
भाद्रपदातला पाऊस पिऊन तृप्त होऊन तारुण्य परिधान केलेलं कोकण आणि गणपती बाप्पाचं
दर्शन हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. बरसणाऱ्या सरी आणि मागून येणार
लक्ख ऊन , दुतर्फा हिरव्यागार भातशेतीची सोबत , वळणावळणाचे रस्ते आणि अचानक बाजूला
फेसाळत्या समुद्राचं झालेलं दर्शन. सफाईदार वळण घेत गावात कधी शिरलो ते समजलं
सुद्धा नाही. मी गणेशभक्त आहे. देव म्हणून मला गणपती प्रिय आहेच पण मला गणेशाचं कलाधिपती हे रूप अधिक भावतं. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या गणरायाचं दर्शन मी कधीच चुकवत नाही.
गावात शिरताच तिथल्या अस्पर्श देखण्या निसर्गाने माझ्या मनावर भुरळ घातली. उतरत्या छपराची जांभ्या दगडातली छान टुमदार घरं , आणि पावसात निथळणाऱ्या नारळी पोफळीच्या बागा. वाट संपूच नये इतका सुंदर प्रवास. नुकतीच पावसाची झिम्माड सर येऊन गेली असल्याने ओल्या वाटेवरूनच मी गावात शिरलो. दोन्ही बाजूंनी माडाच्या झावळ्यांनी केलेल्या कमानी, सोललेल्या सुपार्यांचे ढीग आणि सोबत होती निरवशांतता. मी सकाळसाकळीच गावात शिरलो असल्याने गावाला नुकतीच जाग येत होती. शहरी गडबड गोंधळापासून दूर अशी हि निशब्द सकाळ खूप वेगळी भासत होती.
दर्शनासाठी निघताना नजरेत भरलं ते इथलं स्वच्छ आणि निरोगी वातावरण. एकीकडे किनाऱ्यावरील लाटांचे अविरत शहनाई सारखे पार्श्व संगीत तर दुसरीकडे आकाशाला गवसणी घालणारी आणि वाऱ्याच्या झुळकी बरोबर डोलणारी नारळ सुपारीची झाडं. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच भव्य गणेशवाहक मूषकाची मूर्ती आणि भव्य हत्तीच्या दोन प्रतिमा आपलं स्वागत करतात. प्रत्येक पावलागणिक माझा उत्साह वाढत होता. एकेक पावलं मागे टाकत मी देवाच्या अधिकाधिक जवळ जात होतो. गणपतीच्या बाळलीला आठवतच मी पुढे पुढे जाऊ लागलो. कृष्णाप्रमाणेच गणपतीच्या बाळरुपाचं मला कायम आकर्षण वाटत आलंय. लहानपणी ऐकलेल्या बाप्पाच्या बाळलीला आठवत मी सभागृहात कधी येऊन पोहोचलो ते समजलंसुद्धा नाही. जसजसा लंबोदर गजानन जवळ आल्याची जाणीव झाली तसतसं मन थरारून गेलं. गाभाऱ्यात शिरल्यावर समोर दर्शन घडलं ते थेट '' लंबोदर मोरेश्वराचं''. त्याच शेंदूर विलेपित ध्यान बघितलं आणि मन एकदम शांत झालं. साऱ्याच भावना निवल्या. मनाच्या पोकळीत फक्त तो लंबोदर गजानन भरून राहिला. या निराकार रुपाला फुलांच्या साहाय्यानं ओंकारयुक्त सोंड आणि इतर अवयवांची आकृती काढलेली होती. ताल, मृदूंग, तबला -पेटीच्या सुरांत आरतीचे सूर असे काही मिसळून गेले कि, सगळं माहोल गणेशाच्या भक्तिरसात चिंब होऊन गेला.
''
जय देव जय देव जय मोरेश्वरा तुझा न कळे पार शेषा फणिवरा ''
देवाची साग्रसंगीत आरती म्हणजे केवळ प्रार्थना नसते. तो एक प्रकारे देवाला जागवण्याचा केलेला प्रयत्न असतो. गणेशाचं ते देखणं रूप पंचारतीच्या मंद प्रकाशात अधिकच खुलून दिसत होतं. पुजेनंतर ते झळाळून उठलं होतं. गाभार्याच्या कायापालटच झाला, या आरतीने लंबोदर मोरेश्वर खरोखरच जागृत झालेला वाटला. अर्थात हे वाटणं, आपण मानसिक पातळीवर देवाशी किती तादात्म्य पावतो त्यावर अवलंबून असतं. रूप कोणताही असो, आकार कोणताही असो, तरी भाविकांना भावतो आणि पावतो सुद्धा. मी गणपतीचा निस्सीम भक्त असल्याने तो नेहमीच माझ्याशी बोलतो असं मला वाटत आलंय. या आरतीनंतरसुद्धा मला तसाच भास झाला. केवळ मोरेश्वरच नाही पण, गाभाऱ्यात ठेवलेल्या इतर गणपतीच्या मूर्तीदेखील मला भासमान झाल्यासारख्या वाटल्या. पुजेनेनंतर त्यांना हार , फुले वाहिल्यानंतर त्या मूर्ती चैतन्यमय वाटू लागतात. देव दर्शनाने मी तृप्त झालो. आता देव आणि मी वेगळा नव्हतो. या भरलेल्या अवस्थेतच मी मंदिराच्या आसपास फिरायला सुरवात केली.
या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण टेकडीला परिक्रमा करावी लागते. या टेकडीला गणेशरूप समजून भाविक तिच्याभोवती प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणा मार्गावर कित्तेक वर्षे जुने वटवृक्ष आणि बकुळीचे वृक्ष आहेत. मधेच पावसाची सर आल्यामुळे मी एका डेरेदार बकुळवृक्षाखाली विसावलो.
'' बकुळीच्या झाडाखाली आठवणींची लाख फुले '' हे गाणं आठवला आणि मन अलवर होऊन गेलं. बकुळीचं फुल तसं नाजूक.वाऱ्याच्या झुळकीसोबत थिरकत जेव्हा फुलांचा सडा खाली
पडला, तेव्हा वातावरण सुगंधित होऊन गेलं. त्या विशाल बकुळवृक्षाखाली थोडा वेळ
विसावलो. नाजूक फुलांच्या मंद सुगंधानं मोहरलो आणि पुन्हा पुढे चालू लागलो. तीनही बाजूनी समुद्राच्या लाटांचा स्पर्श आणि एका बाजूला हिरव्यागार वृक्षराजीत पहुडलेलं गणपतीपुळे हे गाव. आणि त्याच्यावर कृपादृष्टी ठेवत डोंगराच्या पायथ्याशी विसावलेला लंबोदर गजानन. या दोन्हीची छाप मनावर कायमची राहते.
प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर माझी पावलं आपोआपच समुद्रकिनाऱ्यावर वळली. पावसाळ्यात समुद्राचं रूप काही वेगळाच असतं. काहीसं अबोल तर काहीसं गंभीर. पाऊस नसताना अवखळ वाटणाऱ्या या लाटा पाऊस आल्यावर वेगाने किनाऱ्यावर आपटतात. ते दृश्य डोळ्यात किती साठवू आणि किती नाही असं होऊन गेलं. मला समुद्रावर आल्यावर नेहमी लहान मूल झाल्यासारखं वाटतं. असं वाटतं वाळूमध्ये किल्ले बांधावेत, शंख-शिंपल्यानी ते सजवावेत, माडाच्या बनातून वाहणाऱ्या वाऱ्याला शीळ घालावी, लाटांशी मजामस्ती करावी. हवा पावसाळी असल्याने समुद्रावर करडे ढग दाटून आले होते. समुद्र काहीसा शांत होता आणि त्याहूनही निवांत होता तिथला किनारा. पुन्हा एकदा समोर पसरलेल्या विस्तीर्ण परिसरावर नजर टाकली. भक्तांवर कृपेची पाखर घालणाऱ्या आणि भक्तांच्या नवसाला अविलंब पावणाऱ्या श्री लंबोदर गजाननाला इतरांप्रमाणे माझ्यावरही तुझी छत्रछाया ठेव अशी मनोमन प्रार्थना केली आणि गणपतीपुळ्याचा निरोप घेतला.
रोहन विवेक दळवी





Comments
Post a Comment