"मन चिंब पावसाळी"...
दीर्घकाळ प्रतीक्षा केलेला पाऊस सारे अडथळे पार करून अखेर एकदाचा येतो आणि कमालीच्या उन्हानं करपत चाललेलं आपलं काळीज ओलं-ओलं करून टाकतो . मग आत आत कुठंतरी जपून ठेवलेल्या कित्येक आठवणी ताज्या करीत आपल्या मनाची तिजोरी आनंदाने भरून टाकतो . आठवणींचे सारे कप्पे कधी तरी सवडीनं मी अलगद उघडून बघतो, तेव्हा ते समस्त निम्मे -अधिक पावसाच्या पाण्यानंच भरलेले असतात. .
करकरीत, निळा रेनकोट घातलेला तो शाळेचा पहिला दिवस , ओलेकच्च भिजलेले माझे केस आणि हात-पाय टॉवेलनं खसाखसा पुसणारी आई, आजीबरोबर फुलपात्रात वेचलेल्या गारा , ओल्या मातीचा खमंग वास, अळवाच्या पानांवर डुचमळणारा तो दंवबिंदू , काही क्षणच दिसून अकस्मात अदृश्य झालेलं इंद्रधनुष्य , शाळेभोवती साचलेलं डबकं, त्यात सोडलेल्या होड्या, एकमेकांच्या अंगावर उडवलेलं पाणी. .
हे सर्व आठवून मन गाऊ लागतं -
" ए आई, मला पावसात जाऊदे ; एकदाच गं , भिजुनी मला; चिंब चिंब होऊदे !' पण तो निरागसपणा आता शक्य नाही. तारुण्यानं माझ्यातलं बाल्य कधीचंच हिरावून नेलंय. .
पावसाचा आनंद घेण्याची प्रत्येकाची पद्धत निराळी असते. काही जणांना पावसात चिंब भिजून धमाल कल्ला करायला आवडतं . काही जण संततधारेकडे एकटक पाहत चहाचे घोट घेणं पसंत करतात. काही जण कांदाभज्यांचा बेत आखून गप्पांचा मस्त फड जमवतात , तर काही शौकिन " मेघमल्हार' शांतपणे ऐकत कॉफीचे भुरके घेतात. कुणाला आत राहून मन भिजवायला आवडतं , तर कुणाला बाहेर जाऊन प्रत्यक्ष भिजायला .. पावसाचं वरून पडणारं पाणी नकळत मनात झिरपतं, अन् त्यातूनच पुढे नात्यांमधला ओलावा तयार होतो.
पावसाच्या बिंदूंचा प्रवास अगदी स्वछंदी असतो. हे दवबिंदू ऊन पडल्यावर हिऱ्याच्या दागिन्यांप्रमाणे चमकू लागतात . काही तारेवर लोंबकळून रोप-वेनं गवताच्या पात्यांवर अल्लद लॅंडिंग करतात , तर काही तृणपात्यांवर घसरगुंडी खेळण्यात रमतात . उरलेले काही पानांना क्षणभर बिलगून टपाटप चिखलात उड्या मारतात . साधारण कळत्या वयाचं झाल्यावर पाऊस आपल्या गुलाबी आठवणींना चिंब चिंब भिजवून टाकत असतो . मग जुन्या आठवणी कधी ताज्या होतात , ते कळतच नाही! जसजसे आपण मोठे होतो, तसतसा पाऊस निरनिराळ्या पद्धतीनं व्यक्त होत असतो. लहानपणी शाळेत दप्तरं भिजतात आणि तरुण वयात मनं ! हाच पाऊस पुढे " चॅट' मध्ये उतरतो . "चॅट थीम ' मध्ये पाऊस आणि आवडता फोटो बॅकग्राउंडला ठेवल्यावर बाहेर पाऊस पडो वा ना पडो, इकडे मनात मात्र तो अखंड बरसतच राहतो.
पाऊस म्हणजे गुलाबी आठवणी . पाऊस म्हणजे रोमॅंटिक गाणी. पाऊस म्हणजे " ट्रेक ' मधली धमाल मस्ती. पाऊस म्हणजे पांघरुणातली मऊ मऊ सुस्ती . पाऊस म्हणजे झिम्माड पाऊसधारांच्या वर्षावात कचकचीत भिजून खरपूस भाजलेलं कणीस खाणं . . अन् पाऊस म्हणजे एकाच छत्रीत निम्मं - निम्मं भिजणं!
रात्री सगळं जग शांत झाल्यावर पावसाच्या लयीचा आपल्याला अंदाज येतो . तो कधी मंदलयीत बरसतो , तर कधी द्रुतलयीत. एखाद्या हृदयस्पर्शी द्रुततानेने काळीज कापावे , तशी मध्येच अचानक वीज कडाडते आणि मनात गूढ दाटून येते . पुन्हा एखादी नाजूक सर ठुमरीसारखी बरसते आणि मन प्रफुल्लित करून जाते . रात्र अशीच सरत जाते .. पहाट उजाडते , तेव्हा सौम्य-शांत भैरवीचा शेवट आलेला असतो. आताशा पावसाची रिपरिप थांबलेली असते. ढगांच्या उबदार दुलईत गुरगुटून झोपलेला सूर्य पांघरूण अलगद दूर सारून आळोखेपिळोखे देऊ लागतो . तेवढ्यात वरून भिजलेल्या उन्हाची पिवळसर कोवळी तिरीप येते, अन् हलकेच झाडाच्या पानांना , तारांवरून ओघळणाऱ्या थेंबांच्या रांगांना स्पर्श करून जाते . पावसाची रिपरिप थांबली तरी, मनात मात्र त्या चिंब सरी कोसळतच असतात. . मन पावसाळी चिंब चिंब भिजतच राहतं ..
रोहन विवेक दळवी.

ऑसम
ReplyDeleteThnx a lot
Deletenice writing keep it up...
ReplyDelete